धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार
मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याचे वृत्त आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तसे त्यांनी पोलिसांना लेखी लिहून दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच रेणू शर्मा यांनी, ‘मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’, असे ट्विट केले होते. त्यानंतर आता त्यांनी तक्रार मागे घेतली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. मग धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियातून यावर खुलासा केला होता. रेणू शर्मा यांनी केलेले सर्व आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे . तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, अशी कबुली मुंडे यांनी दिली होती. मात्र 2019 पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीने निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मुंडे यांचे मंत्रिपद जाणार अशीही चर्चा होती. मात्र आता आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.