धक्कादायक! चोराच्या हल्ल्यात महिला ठार, मुलगा जखमी
देवळा : तालुक्यातील देवपूरपाडे येथे घरात शिरलेल्या चोरटय़ाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला, तर मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवपूरपाडे येथील चिंचमळा शिवारात राहणारे शेतकरी विजय जोंधळे यांच्या घराशेजारी संशयित अंकलेश गांगुर्डे (१९) हा राहतो आहे. त्याने गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास जोंधळे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी जोंधळे यांच्या पत्नी जिजाबाई (५०) यांना जाग आल्याने गांगुर्डेने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात जिजाबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
संशयिताने जिजाबाई यांचा मुलगा संदीप (२७) आणि सून राणी यांच्यावरही हल्ला केला. संदीपच्या डोक्यात आणि हातापायावर संशयिताने वार केले. गंभीर जखमी संदीपवर मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संशयित अंकलेश गांगुर्डे यास ताब्यात घेतले. कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.





