दुष्काळाबाबत सरकार ‘कुंभकर्णी झोपे’त, आम्ही जागं करणार-उद्धव ठाकरे

दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळते आहे. राज्यात दुष्काळाचं नुसतं सावट नाही तर दुष्काळ झपाट्याने पसरतो आहे अशात कोणत्या विभागाने काय कामं करायला पाहिजेत याचा आढावा घेतला पाहिजे आम्ही कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कुंभकर्णा जागा हो अशीच आमची पुढची भूमिका असणार आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूरला २४ तारखेला सभा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे. यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत. शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
राम मंदिराच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे आक्रमक झालेले बघायला मिळाले. निवडणुका आल्या की मंदिर बांधणार अशी घोषणा केली जाते. मात्र मंदिर काही उभारलं जात नाही, त्यामुळेच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. केंद्रात एक मजबूत सरकार सत्तेवर आहे तरीही राम मंदिराचा प्रश्न का सोडवला जात नाही असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.






