दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दापोडीत १२ जणांनी केली तरुणाची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/crime.jpg)
दापोडीत पूर्ववैमनस्यातून १२ जणांनी एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी भोसरी पोलिसांनी चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. सुनील विठ्ठल आरडे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा मित्र अनिकेत दत्ता चांदणे हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
बोपोडी येथे राहणाऱ्या सुनील विठ्ठल आरडे या तरुणचा दीड महिन्यांपूर्वी रवी मांजरेकर याच्याशी भांडण झाले होते. याच रागातून रवी मांजरेकरने त्याचे दोन भाऊ,भाचा ऋषिकेश आणि इतर आठ जणांच्या मदतीने सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बोपोडी दापोडी पुलाजवळील रस्त्यावर सुनील आणि त्याचा मित्र अनिकेतला अडवले. त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यानंतर आरोपींनी दगड,सिमेंट ब्लॉक, कोयत्याने दोघांवर हल्ला केला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनील आणि अनिकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर अनिकेत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील रिक्षा चालक असल्याचं सांगण्यात येत आहे.या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.