दिल्ली : आमदार मेटेंनी मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न आक्रमकपणे राज्य शासनाकडे मांडला!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/aa-Cover-gck17msjlhfv51bjj68a81b9v5-20190412040918.Medi_.jpeg)
सारथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली ग्वाही
बीड | महाईन्यूज | प्रतिनिधी
सारथी संस्थेने घेतलेल्या प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५.५ महिन्यांकरिता दिल्ली येथे शिकवणीची सुविधा व मासिक विद्यावेतन रुपये १३००० देण्याचे योजिले होते. याअंतर्गत २२५ विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शिकवणी प्रोग्रॅम २०१९-२० अंतर्गत निवड झालेली होती. या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी उलटत आलेला असतानादेखील जानेवारी महिन्याचे विद्यावेतन मिळालेले नाही. या विद्यार्थ्यांनी आक्रमक होत काल दि १७ रोजी जंतरमंतर मैदानावर ठिय्या मांडला होता. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांनी या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांनी ‘इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी फोनद्वारे संपर्क करत विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. यावेळी आ विनायकराव मेटे यांना मंत्री वडेट्टीवार यांनी येत्या २ ते ३ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे विद्यावेतन खात्यावर जमा करण्याचा शब्द दिला. सोबतच संस्थेची स्वायत्तता टिकून राहणार असल्याचेही सांगितले.