दिलासादायक बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार
![ST travel is also expensive; 17.17 per cent fare hike ahead of Diwali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/images_1538734598608_st_bus.jpg)
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आझाद मैदानात दोन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आणि एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. जर आम्हाला पगार मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करु आणि राज्य सरकारला न्यायालयात खेचू असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला होता.
पगार न झाल्याने एसटी महामंडळाचे एक लाखापेक्षा जास्त कामगार ७ ऑक्टोबरपासून आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. त्याची दखल न घेतल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.