breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘त्या’ अहवालातील १६ पुलांची तातडीने दुरुस्ती

मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तांत्रिक सल्लागाराने दुरुस्तीची शिफारस केलेल्या १६ पुलांची कामे सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तब्बल २१.६० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला ११.४५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळल्याप्रकरणी संरचनात्मक तपासणीसाठी नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागाराला दोषी धरण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक सल्लागार डी. डी. देसाईज् असोसिएटेड इंजिनीअिरग कन्सल्टन्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस्ट कंपनीचे नीरज देसाई यांना अटक केली. या कंपनीने शहरातील १६ पूल आणि भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची शिफारस केली होती. त्यानुसार १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी पूल विभागाने ११ जानेवारी २०१९ रोजी निविदा मागविल्या होत्या. सात कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती प्रशासनाने जैन कन्स्ट्रक्शनला १६ पुलांच्या दुरुस्तीचे काम देण्यावर शिक्कामोर्तब केले.

या १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे १३ कोटी ४० लाख ८९ हजार रुपये खर्च येईल अशी पालिकेची अपेक्षा होती. मात्र हे काम अंदाजित खर्चाच्या २१.६० टक्के कमी दरात करण्याची तयारी जैन कन्स्ट्रक्शन कंपनीने दर्शविली असून प्रशासनाने हे काम या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने तातडीने या कामांचा प्रस्ताव पालिकेच्या चिटणीस विभागाकडे सादर केला असून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे.

तांत्रिक सल्लागाराच्या शिफारशीनुसार प्रशासनाने १६ पूल आणि भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय जानेवारी २०१९ मध्ये घेतला होता. मात्र त्यात हिमालय पुलाचा समावेशच नसल्याचे उघडकीस आले आहे. सल्लागाराने हिमालय पूल सुस्थितीत असल्याने नमूद करतानाच त्याची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. मात्र प्रशासनाने जानेवारीमध्ये पुलांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविताना हिमालय पुलाचा विचारच केला नसल्याचे या प्रस्तावावरून उघड होत आहे.

दुरुस्त करण्यात येणारे पूल

ग्रॅन्ट रोड रेल्वेवरील पूल, ऑपेरा हाऊस पूूल, फ्रेंच पूल, हाजीअली भुयारी मार्ग, फॉकलॅण्ड रोड (डायना ब्रिज), प्रिन्सेस स्ट्रीट पादचारी पूल, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, सीएसटीएम भुयारी मार्ग, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, सीताराम सेलम वाय उड्डाणपूल, पूर्व मुक्तमार्ग, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, सर पी. डिमेलो पादचारी पूल, डॉकयार्ड रोड पादचारी पूल, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button