‘ती’ अभिनंदनची पत्नी नव्हेच!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/fake-video.jpg)
मुंबई : भारतीय सैनिकाची पत्नी असल्याचा दावा करत, सध्या भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेले तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता त्यावरून राजकारण करू नका, भारतीय लष्कर, वायुदलाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकारण्यांनी करू नये, असे आवाहन करतानाचा एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. व्हीडिओमधील महिला ही भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पत्नी असल्याचा संदेश सोशल मीडियावर पसरवला जात आहे. मात्र व्हीडिओमधील महिला ही अभिनंदन यांची पत्नी नसल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे अभिनंदन शुक्रवारी भारतात परतणार आहेत. त्यामुळे देशवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दूसरीकडे अभिनंदन यांची पत्नी असल्याचा दावा करणारा एका महिलेचा व्हीडिओ सकाळपासून व्हॉटस अॅप, फेसबुकवर व्हायरल होत आहे. व्हीडिओमधील महिला भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाचे राजकारण करू नये असे म्हणत आहे.
या आहेत अभिनंदन यांच्या पत्नी
व्हीडिओमधील महिलेची कोणतीही सतत्या न तपासता हा व्हीडिओ फॉरवर्ड केला जात आहे. मुळात अभिनंदन यांच्या पत्नीचे नाव तन्वी मारवाह असून त्या भारतीय वायु सेनेतील निवृत्त वैमानिक आहेत. त्यामुळे व्हायरल होणारया व्हीडिओमधील महिला अभिनंदन यांची पत्नी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणत आहे महिला?
‘मी एका सैनिकाची पत्नी आहे. सर्व लष्करी कुटुंबियांच्या वतीने मी देशवासीयांना आवाहन करु इच्छीते की, विशेषत: राजकारण्यांना, देशासाठी शहीद झालेल्या, बलिदान दिलेल्या जवानांचे कुणी राजकारण करू नये. अभिनंदन यांच्या कुटुंबियांची सध्या काय अवस्था झाली असेल हे लक्षात घ्या. राजकारण्यांना त्यांचे राजकारण करायला खूप वेळ आहे. विशेषत: भाजपा नेत्यांनी या सर्व घडामोडींचे राजकारण करू नये, श्रेय घेऊ नये’ असे म्हणत या महिलेने भाजपावर निशाणा साधला आहे.