‘तरंगणाऱ्या’ लोकल, भांबावलेले प्रवासी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/tv01r-1.jpg)
मध्य रेल्वेच्या रुळांवरील मुक्कामाचा प्रवाशांना अनुभव
मुंबई : सोमवारी रात्री साडेदहाची वेळ. दिवसभर विस्कळीत झालेली लोकलसेवा रुळांवर आल्याचे संदेश फिरू लागले आणि घरी कसे परतायचे, या विवंचनेत असलेल्या प्रवाशांच्या जिवात जीव आला. मुलुंडपर्यंत लोकल सुरू असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी नेहमीच्या घाईने रेल्वेच्या डब्यात जागा पटकावली. पण याच जागेवर पुढील दहा तास काढावे लागतील, याची अनेक प्रवाशांनी कल्पनाही केलेली नव्हती.
मुंबई आणि परिसरात होणाऱ्या संभाव्य पावसाच्या इशाऱ्यामुळे अनेकांनी लवकरच कार्यालय सोडले होते. रात्री १०.३० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लोकल गाडय़ांची वाहतूक बऱ्यापैकी वेळेवर सुरू होती. पण हे सारे चित्र पुढच्या तासाभरातच पालटले. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी या संपूर्ण पट्टय़ात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने गाडय़ा खोळंबू लागल्या. घाटकोपर-विक्रोळीदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत होता. रेल्वेकडून कसलीच माहिती दिली जात नव्हती. गाडी सुरू व्हायची प्रतीक्षा करायची की रुळांवर साचलेल्या पाण्यात उतरून पुढची वाट धरायची.. प्रवाशांना काहीच कळेनासे झाले होते.
एव्हाना लोकल गाडय़ांची दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात एकही लोकल गाडी दिसत नव्हती. फक्त हार्बर मार्गावर एक- दोन गाडय़ा आल्या. रात्री बारानंतर तशी गर्दी तुरळक होती, मात्र पुढे प्रत्येक स्थानकात प्रवासी गाडय़ांच्या प्रतीक्षेत थांबलेले. अखेरीस १२.३० वाजता केंद्रीय सूचना प्रसारण कक्षातून लोकल गाडय़ांची वाहतूक स्थगित करण्यात आल्याची उद्घोषणा करण्यात आली. रात्री १२.४० वाजता मध्य रेल्वेने ट्वीटही केले. मात्र प्रवासी अडकले ते अडकलेच. ही माहिती सर्वच प्रवाशांना मिळाली नव्हती. ज्यांना कळले त्यांनी रुळावर उतरून जवळच्या स्थानकाकडे जायला सुरुवात केली. कुर्ला ते विद्याविहारदरम्यान अडकलेल्या प्रवाशांनी रुळावर साठलेल्या पाण्यातूनच विद्याविहार स्थानक गाठले. विद्याविहार पूर्वेला स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले होते, रस्त्यावरचे दिवे बंद, पोलीस किंवा इतर यंत्रणाचे कसलेच अस्तित्व नाही. अखेर प्रवाशांनी पुढे चालत चालत राजावाडी रुग्णालय गाठले. तेथे विशाल भारद्वाज आणि त्यांची पत्नी इनोव्हा गाडी घेऊन अडकलेल्या लोकांना सोडण्याचे काम करत होते. पुढील प्रवासाचे वाहन मिळेल अशा ठिकाणापर्यंत ते लोकांना सोडत होते. प्रवासी आपापल्या सोयीने त्यांना कोठे जायचे ते सांगत होते आणि हे दाम्पत्य त्यांना गाडीने सोडत होते. पहाटे पाचपर्यंत त्यांचे हे काम सुरूच होते.
इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील लोकल गाडय़ांची वाहतूक स्थगित झाल्याच्या उद्घोषणेनंतर प्रवाशांनी अन्य पर्याय शोधायला सुरुवात केली. मेल एक्स्प्रेसच्या वेळादेखील निघून गेल्या होत्या. काहींनी स्थानकातच बैठक मारली, तर काहींनी टॅक्सी, ओला, उबरचा पर्याय धुंडाळला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून फ्रीवेने मुंबईबाहेर पडण्याचा मार्ग शोधला. वाटेत सहकारी अडकले होते त्यांना बरोबर घेत घर गाठले. कुर्ला-वाशी हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्यामुळे काहींनी वाशीमार्गे ठाणे, डोंबिवलीचा पर्याय निवडला. ठाणे स्थानकापर्यंत पोहचलेल्यांना रात्री दोननंतर कर्जत आणि कसारा या विशेष गाडय़ांनी पुढे जाणे शक्य झाले. पण ज्यांना रेल्वे मार्गातून चालण्यासारखी परिस्थिती नव्हती ते पहाटेपर्यंत लोकलमध्येच ताटकळले होते.