breaking-newsमहाराष्ट्र

डेंग्यू, स्वाइन फ्लूचे राज्यात १२९ बळी!

पुणे : सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानामुळे राज्यात डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि चिकुनगुनिया या विषाणूजन्य आजारांनी प्रवेश केला असून गेल्या काही महिन्यांत त्यामुळे शेकडो रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर आली आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यात डेंग्यूमुळे १८, तर स्वाइन फ्लूमुळे १११ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रात असल्याचे दिसून आले. चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्य़ात तर स्वाइन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण पुणे, नाशिक जिल्हा तसेच पुणे, नाशिक महापालिका क्षेत्रांत आढळले आहेत.

यंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात तीन रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात एकूण चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रत्येकी एक, तर नाशिक, जालना, वसई विरार महापालिकेत प्रत्येकी एक रुग्ण डेंग्यूमुळे दगावला आहे. मुंबईमध्ये चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर महापालिकेत ११८६, नाशिक महापालिकेत ४५२, मुंबई महापालिकेतील ४२६, तर पुणे महापालिकेत २७८ रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील ४८७ रुग्णांना चिकुनगुनियाची लागण झाली असून त्यांपैकी सर्वाधिक १०० रुग्ण पुणे जिल्ह्य़ात आढळले आहेत. सांगली जिल्ह्य़ात ३९, नाशिक जिल्ह्य़ात २८, पुणे महापालिका क्षेत्रात १५४ तर नाशिक महापालिका क्षेत्रात ४३ रुग्ण आढळले आहेत.

राज्यभरात स्वाइन फ्लू या आजाराने आपले हात पाय पसरले असून यंदा १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून त्यांपैकी सर्वाधिक रुग्ण पुणे आणि नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये आढळले आहेत. राज्यभरात जानेवारी २०१८ पासून एकूण १११ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील पस्तीस, तर नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले,की २०१७ मध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे ७८८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै २०१८ पर्यंत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले नाहीत. राज्याच्या बहुतांश भागात आढळलेले स्वाइन फ्लूचे रुग्ण जुलैनंतर लागण झालेले आहेत. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, गरोदर महिला अशा सुमारे एक लाख २८ हजार नागरिकांना आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूची लस देण्यात आली, त्यापैकी पंचावन्न हजार सहाशे चाळीस नागरिक पुणे विभागातील आहेत.

ही लस दरवर्षी घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण ताप आला असता त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे गरजेचे आहे. घरच्या घरी काँबिफ्लेम किंवा ब्रुफेनसारखे औषध घेतल्याने डेंग्यूसारख्या आजारात अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

परिस्थिती काय?

यंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले. तर १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यातील १११ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे, नाशिक. मुंबई, वसई-विरार या शहरांमधील नागरिकांनाही विषाणूजन्य आजाराने वेढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button