ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन
मुंबई – टीव्हीवरील “निमकी मुखिया’ मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे काल (17 जुलै) निधन झाले. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयातील उपचार सुरु होते. किडनी निकामी झाल्याने त्यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी फेसबुकद्वारे रीता भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली. “मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, रीटा भादुरी आपल्यात राहिल्या नाहीत. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मुंबईतील अंधेरी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्या आमच्यासाठी आईप्रमाणे होत्या. तू कायमच आमच्या स्मरणात राहशील, मां, अशी त्यांची पोस्ट आहे.
साराभाई व्हर्सेस साराभाई, अमानत, एक नई पहचान आणि बायबल की कहानियां या मालिकांसह रीटा भादुरी यांनी अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. सावन को आने दो, हीरो नंबर 1 आणि बेटा यासह त्यांनी 70हुन अधिक हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच 30हुन अधिक मालिकांसह गुजराती चित्रपटसृष्टीतही काम केले होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह, मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.