जिम, मंदिरे सुरु होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई – राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरीही अद्याप जिम, मंदिरे, शाळा, कोचिंग क्लासेस बंद आहेत. त्यामुळे ही आस्थापनं आणि धार्मिक स्थळं सुरू होण्याकरता मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना जिम आणि मंदिरांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
जिमबाबत चर्चा सुरू
जिम सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. जिमसाठी नियमावली आवश्यक आहे त्याविषयी बोलणी सुरु आहेक. असं सांगतानाच जिम इतक्यात सुरू होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
मंदिराबाबत काय निर्णय
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे. सणासुदीतही हे आवाहन केलं होतं. सर्व धर्मीयांनी माझं म्हणणं ऐकलं. राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरू झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारांतून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.





