जालन्यात मनसे कार्यकर्त्यांकडून वीजवितरण कार्यालयाची तोडफोड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/mns-jalna.png)
जालना- लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीजबिल माफ करा, अशी वारंवार मागणी करूनही त्यावर ठोस तोडगा निघत नव्हता. त्यामुळे आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यातील अंबड वीज वितरण केंद्रावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत वीजवितरणच्या कारभाराचा निषेध केला.
लॉकडाऊन काळात नागरिकांना आलेल्या अवाजवी वीजबिलांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज जालना जिल्ह्यातील अंबड येथील वीज वितरण कार्यालयाबाहेर मनसेचे नेते बळीराम खटगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम राहिले नाही त्यामुळे या काळात आलेली अवाजवी वीजबिले माफ करावीत, उर्वरित बिलाची रक्कम सवलत देऊन टप्प्याटप्प्याने वसुल करावी, वीज जोडणी खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच वारंवार निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याचे यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनी वीजवितरण कार्यालयात संगणकासह काचा, खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करत निषेध व्यक्त केला.