“जायका’मुळे मैलापाणी नदीत सोडणे थांबेल का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/mula-mutha-pune-696x418-1.jpg)
पुणेकरांचा आशावाद : प्रकल्पाला गती मात्र मिळेना
पुणे – मुळा-मुठा नदीपात्र आणि पाण्याच्या स्वच्छतेसाठी केंद्राने सुमारे 990 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य “जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ अर्थात “जायका’ यांच्याकडून घेतले आहे. त्यातूनच नदीप्रवाहाबरोबरच नदीपात्राचेही सुशोभिकरण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आणि महत्त्वाचे म्हणजे आणखी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे तरी किमान मैलापाणी नदीत सोडण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
मुळा-मुठा नदीपात्रातील सुमारे 44 किमीचे क्षेत्र सुधारण्यात येणार आहेत. यामध्ये नदीपात्रातील गाळ काढून नदी स्वच्छ करणे, सांडपाणी नदीत प्रक्रिया न करता जाणार नाही याची व्यवस्था करणे, पावसाळी गटारांची जोडणी, नदीकाठ सुशोभिकरण अशा गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पाला अजिबातच गती मिळाली नाही.
हा प्रकल्प आणल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला, परंतु त्यानंतर दोन वर्षे या विषयात काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर थोडीफार हालचाल झाली आणि सुमारे 50-60 कोटी रुपये महापालिकेच्या पारड्यात पडले. दरम्यान, यामध्ये सल्लागार नेमला आणि त्याचे काम सुरू आहे. परंतु “जायका’च्या निविदा प्रक्रिया आणि काम सुरू व्हायला 2019 च उजाडणार असल्याने गेल्या दोन वर्षांपासून “जायका’साठी महापालिकेने तरतूद केलेला निधी अन्य कामांसाठी वर्गीकरण करण्यात आला.
या वर्गीकरणावरून महापालिकेतील नुकत्याच झालेल्या मुख्यसभेत गदारोळही झाला. मात्र, 2019 च्या जानेवारी महिन्यात या संदर्भातील काम सुरू होणार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे येत्या जानेवारीमध्येतरी या कामाला मुहूर्त लागतो का, ते पाहावे लागेल.