जमिनीची सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी एक लाखाची मागणी, तलाठी एसीबीच्या जाळ्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/लाचखोर.jpg)
पुणे |महाईन्यूज|
लोणावळ्याजवळील कार्ला वेहरगाव येथील गाव सजा तलाठ्यासह तिघांना खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणात सव्वादोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यातील एक लाख रुपये घेताना तलाठ्यासह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
गाव तलाठी घनश्याम शंकर सोमवंशी (वय ४३), गणेश गोपीनाथ वायकर (वय ४२, रा. कार्ला, ता. मावळ), आणि अविनाश सुनील देवकर अशी लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका ३४ वर्षीय व्यक्तीने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार कार्ला-वेहेरगाव सजाचे तलाठी सोमवंशी यांच्याकडे गेले होते. मात्र, तलाठ्याने या जमिनीची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली, तसेच दोन मध्यस्थांच्या मदतीने तक्रारदाराकडे दोन लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदाराने सुरुवातीला एक लाख रुपये देण्याचे कबूल केले. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भोसले व अमोल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.