छत्रपती शिवाजी महाराजांचे मोडी लिपीत असं होतं हस्ताक्षर
औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः मोडीलिपीत लिहिलेले पत्र येथील पुराणवस्तू संग्रहालयात आहे. हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक बाळासाहेब पाटील यांनी हे पत्र जतन करून ठेवले होते. छत्रपती शिवरायांनी भोसले घराण्याचा धार्मिक विधी करण्याचे अधिकार पैठण येथील गोविंद कावळे भट यांना दिले होते. त्या संबंधीचा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र शके १५८१ मध्ये देण्यात आले असल्याची नोंद या पत्रात आहेत. हे पत्र संत ज्ञानेश्वर उद्यानातील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या बाळासाहेब पाटील पुराणवस्तू संग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

कधी दिले होते महाराजांनी पत्र
छत्रपती शिवाजी महाराज पैठण येथे आले होते. त्याकाळी गोविंद कावळे यांच्याकडे भोसले घराण्यातील मालोजीराव व त्यांच्या पुर्वाजांच्या वंशावळी कावळे भट पुरोहितांनी दाखविल्या होत्या. त्यात तीर्थाच्या स्थळी होणारे विविध धार्मिक विधी कावळे भट यांच्याकडूनच करण्यात आल्या होत्या. वंशावळीचा हा पुरावा पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भोसले घराण्यातील कोणीही पैठणला येईल त्यावेळी भोसले घराण्यातील धार्मिक विधी करण्याचा अधिकारी कावळे भट यांना या पत्राद्वारे दिला होता.





