घोषणाबाज सरकारचा शेवट जवळ!
![The Center should make constitutional provision for Maratha reservation, demanded Ashok Chavan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/29_bmsnr_01_Ash29BM_ASHOK_CHAVAN.j.jpg)
अशोक चव्हाण यांची टीका ; भूमिपूजन म्हणजे धूळफेक
गेल्या चार वर्षांत विकासाच्या केवळ पोकळ घोषणा करणे, या पलीकडे केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केले नाही, अशा या भाजप सरकारचा अंत आता जवळ आला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे व अन्य विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या विविध घोषणांवर चव्हाण यांनी टीका केली.
सिडको महागृहनिर्माण योजनेअंतर्गत ८९ हजार ७११ घरे बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी कल्याण येथे करण्यात आले. नवी मुंबई येथील विविध रेल्वे स्थानकांच्या जवळ बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन कल्याण येथे कसे करण्यात येते, असा सवाल चव्हाण यांनी केला. या गृहनिर्माण प्रकल्पाची निविदाही अजून काढण्यात आलेली नाही. तसेच हा प्रकल्प इतर प्रस्तावित प्रकल्पांकरिता राखीव असलेल्या जागांवर करण्यात येणार असल्याने जमिनीच्या वापरातही बदल करणे आवश्यक आहे. निवडणुकांपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. तरीही भूमिपूजनाचे नाटक करून जनतेला फसविले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांनी ठाणे ते भिवंडी अशा मेट्रो प्रकल्पाचेही भूमिपूजन केले. या प्रकल्पासाठी एक इंचही जमिनीचे संपादन झालेले नाही. पर्यावरण व वन विभागाची परवानगी देखील मिळलेली नाही असे असतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिशाभूल करणारा हा प्रकार आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.