घरे हादरली, काचांचा चक्काचूर, कानाला दडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/bpcl-blast.jpg)
- ‘बीपीसीएल’मधील स्फोटाचे दहा किमी परिघात हादरे; भूकंपाच्या भीतीने रहिवासी घराबाहेर
भारत पेट्रोलियम महामंडळाच्या (बीपीसीएल) तेलशुद्धीकरण प्रकल्पात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या स्फोटाने अवघे चेंबूरच नव्हे तर गोवंडी आणि मानखुर्द परिसरही हादरून गेले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याच्या केवळ आवाजानेच आसपासच्या परिसरातील घरांच्या भिंती थरारल्या आणि खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर झाला. काही किलोमीटर परिसरातील दुकाने व घरांचेही या स्फोटामुळे नुकसान झाले. हा हादरा इतका मोठा होता की, भूकंप झाल्याच्या भीतीने अनेक ठिकाणी रहिवासी घराबाहेर पडले.
चेंबूरच्या माहुल येथील खाडीकिनारी तेलकंपन्यांचे शुद्धीकरण प्रकल्प आहेत. शिवाय आरसीएफसारख्या बडय़ा कंपन्यांचे जाळे आहे. याच प्रकल्प, कंपन्यांच्या शेजारी गव्हाण, गव्हाण पाडा, गडकरी खाण, शंकर देऊळ, वाशी गाव, माहुल गाव या वस्त्या दाटीवाटीने वसल्या आहेत. दुपारी घडला शक्तिशाली स्फोट सर्वप्रथम या वस्त्या, वसाहतींमधल्या रहिवाशांना हादरवून गेला. या स्फोटाचा आवाज सुमारे दहा ते बारा किलोमीटरच्या परिघातल्या मनुष्यवस्तीत जाणवला.
‘दुपारी तीनच्या सुमारास जेवायला बसलो असतानाच प्रचंड मोठा आवाज आला. हातातला घास तसाच टाकून बाहेर पडलो तर इमारतीतील सर्वच रहिवासी घराबाहेर आले होते. काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, नंतर ‘बीपीसीएल’च्या स्फोटाचे वृत्त समजले,’ असे मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथील वसाहतीत राहणारे रघुनाथ मस्के यांनी सांगितले.
प्रकल्पापासून जवळच असलेल्या शंकर देऊळ परिसरात राहणारे प्रकाश जाधव दुपारी इमारतीच्या जिन्यावर होते. ‘स्फोटाच्या आवाजाने कानाचे दडे बसले. इमारतही हादरून गेली. इमारत खचतेय, या भीतीने मागच्या मागे खाली उतरलो आणि घरच्यांना फोन करून घराबाहेर येण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बीपीसीएल प्रकल्पातून आकाशात झेपावणारा आगीचा मोठा लोळ दिसला,’ असे त्यांनी सांगितले.