घराणेशाहिवर बोलणा-यांनी आत्मचिंतन करावं- रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/2Rohit_Pawar.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – घराणेशाहीवर बोलताना मुख्यमंत्र्यांना सुजय विखे, रणजीत मोहिते कशाला पाहिजेत?, असा सडेतोड प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपात दुसऱ्या पक्षातली इतकी पिळावळं आहेत, की त्यांची नावही आठवत नाहीत. त्यामुळे घराणेशाहीवर बोलणा-यांनी आपण कसं वागतो याचं आत्मचिंतन करावं, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. वाकड येथील स्थलांतरीत नागरिकांशी ते संवाद साधत होते.
रोहित पवार म्हणाले, २०१४ ला भाजपाचा अजेंडा हा केवळ विकास होता. त्यामुळे नागरिकांना देश पुढे जाईल, विकास होईल असं वाटलं होतं. मात्र, भाजपाने सोशल मीडियाचा वापर करुन खोट्या बातम्या पसरवल्या आणि त्यानंतर निवडून आले. मात्र, आता भाजपाच्या नेत्यांच्या भाषणात ‘विकास’ हा शब्द येतोय का?
नुकतचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं यावेळी पुढून टाळीच येत नव्हती, त्यामुळे ते मोठं मोठ्याने ओरडून भाषण करत होते. या भाषणात ते घराणेशाही, शरद पवारांवर बोलले. पण विकासावर काही बोलले नाहीत. गोपीनाथ मुंडे हे घराणेशाहीच्या विरोधात बोलायचे. मात्र, त्यांनीही दुसऱ्या पक्षातून राजकीय वारसा असलेल्यांना आपल्या पक्षात घेतलं. तसेच, बाळासाहेब ठाकरेही घराणेशाहीच्या विरोधात बोलत होते. मात्र, त्यांनी राज ठाकरेंची क्षमता असतानाही कोणाचा विचार केला तुम्हाला माहितीच आहे.
पदार्पणातील पहिल्या भाषणाचा किती बाऊ करायचा?
पिंपरीतील मावळ प्रचार प्रारंभ सभेत उमेदवार पार्थ पवार यांना बोलताना आले नाही. त्यावर रोहित म्हणाले की, एखाद्या भाषणावरून किती बाऊ करायचा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. साहेब आणि दादा समोर असल्यानंतर मलाही कधी कधी बोलता येत नाही, तशी परिस्थिती पार्थची झाली होती.