गळ्यातील चेन मिळवण्यासाठी तिघांनी मिळून केली मित्राची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/murder-1_201707279.jpg)
60 हजार रुपयांच्या दागिन्यांसाठी तिघांनी मिळून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंडीत ही घटना घडली आहे. आरोपींमध्ये 16 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरला अविनाश दिलपे (26), कृष्णा सुतार आणि 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने राजू गायकवाडला दारु पिण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी तिघांनी राजू गायकवाड याच्यावर हल्ला करत त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतली आणि खाडीत ढकलून दिलं अशी माहिती तपास अधिकारी विलास दायगुडे यांनी दिली आहे.
दुसऱ्या दिवशी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. 7 डिसेंबरला यल्लो गेटला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रुमला देण्यात आली. ‘कॉन्स्टेबल सुयोग कुलकर्णी यांनी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाला मृतदेहाचा फोटा दाखवला असता त्यांच्या पत्नीने ओळख पटवली’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शशिकांत माने यांनी दिली आहे.
‘गायकवाड यांच्या पत्नीला 16 वर्षीय आरोपीच्या भावाने ते घसरुन खाडीत पडले असतील अशी शक्यता बोलून दाखवली. यावरुन आम्हाला संशय आला आणि आम्ही अल्पवयीन तरुणाची चौकशी केली असता त्याने सगळा प्रकार सांगितला’, असं शशिकांत माने यांनी सांगितलं आहे.