गणेशोत्सावात मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद : 63 लाख 23 हजार रुपयांचे उत्पन्न
प्रशासनाची माहिती : मेट्रोला 63 लाख 23 हजार 718 रुपयांचे उत्पन्न मिळाले
पिंपरी : गणेशोत्सवात मेट्रोने रात्री उशिरापर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या दिवसात सुमारे 4 लाख 5 हजार 280 जणांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांत मेट्रोने प्रवास केला. यामधून मेट्रोला 63 लाख 23 हजार 718 रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गणेशोत्सावात पुण्यात देखावे पाहण्यासाठी, विसर्जन मिरवणूकीसाठी शहरातील नागरिक जातात. वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या फे र्या वाढविल्या होत्या. रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरु ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय टळली होती. पुण्यातील देखावे पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये 21 लाख 16 हजार 772 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून 3 कोटी 25 लाख 88 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, सप्टेंबर महिन्यात (28 तारखेपर्यंत) 19 लाख 13 हजार 227 नागरिकांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 81 लाख 89 हजार 760 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एक ऑगस्टपासून मेट्रो पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते रुबी हॉल क्लिनिक आणि वनाजपर्यंत धावत आहे. तेव्हापासून महापालिका भवन स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशन या मार्गावर 16 लाख 89 हजार 858 जणांनी प्रवास केला. त्यातून 2 कोटी 67 लाख 44 हजार 304 रुपयांचे उत्पन्न मिळाले. वनाज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन मार्गावर 22 लाख 74 हजार 197 नागरिकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून एकूण 3 कोटी 22 लाख 42 हजार 665 रुपयांचे उत्पन्न मिळाले, असल्याची माहिती प्रशासनाने दिली.