खासदार सुप्रिया सुळे यांची जिम सुरू करण्याची मागणी
![Notice to Nawabbhai means notice to us - Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/images_1578486313098_Supriya_Sule.jpg)
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जिम उघडण्याची मागणी केली आहे.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे’, असे सुप्रिया सुळे ट्विटरवर म्हणाल्या आहेत.
याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी ‘जिम उघडा, बघू काय होतं’, असा सल्ला दिला होता.
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांचेही म्हणने आहे की जिम सुरू झाली पाहिजे. आता मी सांगतोय, जिम सुरू करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय’, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरू करण्याची मागणी केली होती.