खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/amol.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. दरम्यान, दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत कोल्हे जायंट किलर ठरले होते. शिवाजीराव आढळराव पाटील हे यापूर्वी तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, कोल्हे यांनी त्यांचा 58,483 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत घेण्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक प्रयत्न होताना दिसत आहे. त्यातच अमोल कोल्हे यांच्या भेटीने या चर्चांना अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.