कोरोना नंतर पोलिसांवर आता अजून एक ताण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Capture-11.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त ताण कोणाला सहन करावा लागत असेन तर तो पोलिसांना… त्यात आता पोलिसांमध्येही कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. त्यात आता पोलिसांना आणखी एका चिंतेला सामोर जाव लागणार आहे.पोलीस खात्यातील सर्वच अधिकारी रात्रंदिवस काम करत असताना शासनाच्या एका जीआरने पोलीस उपविभागीय अधिकारी पदावरील 185 जणांना चिंतेत टाकले आहे . त्यांना खात्यांतर्गत असलेल्या परीक्षेला बसावे लागणार आहे. यावरच त्यांचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे ते मोठ्या कात्रीत सापडले आहेत…
8 वर्षांआधी पोलीस उपविभागीय अधिकारी पदावर भरती झालेल्या 185 जणांना खात्यांतर्गत असणारी ही परीक्षा बंधनकारक होती. मात्र, मधल्या काळात ही परीक्षा घेतलीच गेली नाही. त्यामुळे 6 ते 11 वर्षे सेवा होऊनही त्यांची परीक्षा प्रलंबित राहिली. आता ही परीक्षा घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. मात्र, याचा मुहूर्त चुकला असल्याचं पोलीस खात्यातून बोललं जातं आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक पोलीस अधिकारी तणावाखाली आहेत. त्यात ही परीक्षा आल्याने त्यांना काय करावे हे सुचेनासे झाले आहे. ही परीक्षा देण्यासाठी जर अभ्यास करायचा, तर त्यासाठी रजा मिळणही कठीण झालं आहे. तिकडे गडचिरोलीसारख्या भागातील पोलीस अधिकारी तर 24 तास अलर्टवर असतात. त्यांना शासन परीक्षेसाठी सुट्टी आणि वेळ तरी कसा मिळणार हाच प्रश्न आहे… शासन मात्र परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावर अजूनही ठाम आहे.
या सर्व प्रकारानंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) झाल्यानंतर 2 वर्षात परीक्षा घेणं बंधनकारक असताना मागील 10 वर्षे ही परीक्षा का घेतली गेली नाही? असाही प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे याआधी काही विषयांची परीक्षाही झाली आहे. असं असताना देखील त्या विषयांची पुन्हा परीक्षा घेण्याबद्दल या अधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. अभ्यासक्रम अधिक असल्याने त्यासाठी 6 महिन्यांहून अधिक काळ अभ्यासासाठी लागणार आहे, असं काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. कोरोना काळात एवढ्या मोठ्या कालावधीची रजा दिली जाणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थि होत आहे.
या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास या काळात त्या त्या अधिकाऱ्यांनी केलेले खात्याचे पोलीस तपासाचे काम ग्राह्य धरले जाणार का? गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी बोलावलेल्या बैठकीत परीक्षा रद्द करणे किंवा पुस्तकांसह परीक्षा घेणे असे ठरले होते. मात्र, नव्या अभ्यासक्रमासह नवी परीक्षा का? असा प्रश्न या डीवायएसपी अधिकाऱ्यांनी सरकारला केला आहे.
नुकतेच विद्यापीठ परीक्षा आणि इतरही शैक्षणिक परीक्षांचा मुद्दा ऐरणीवर असताना या पोलीस खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेने पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर वेगळीच समस्या उभी केली आहे. आता यावर शासन ठाम असले तरी पोलीस अधिकारी कितपत या परिक्षेसाठी तयार होतील हे पहावे लागणार आहे.