कोपरगावनजीक अपघातांची मालिका सुरूच
![Young woman killed in dumping of illegal sand transport dumper](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/accident.jpg)
कोपरगाव – रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडाझुडपामुळे पाठीमागून येणाऱ्या एसटी बसला समोर चालणारी मोटारसायकल न दिसल्याने बसची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात कोपरगाव येथील प्रगतशिल शेतकरी व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव शिवाराम बोरावके (वय 68 रा.बोरावके वस्ती) यांचा जागीच मृत्यू झाला.
बोरावके पत्नीला नातेवाईकांकडे मोटारसायकलवरून सोडण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावरून पांढरे वस्ती येथे गेले होते. आज सकाळी 11 वाजता पत्नीला सोडून ते पुन्हा कोपरगावमध्ये येत असतांना येवल्याकडे जाणार एसटी बस (क्रमाक एम.एच.20 बी.एल.3470)ची बोरावके यांच्या (एम.एच.17 ए.टी.6776) या मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने ज्ञानदेव बोरावके यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतू उपचारापूर्वीचे त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकी अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी जाहिर केले.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून बस व बसचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, ज्ञानदेव बोरावके हे नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विरेन बोरावके यांचे वडील आहेत. बोरावके यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
बोरावके यांच्या अपघाताची माहित कळताच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दीकेली होती. आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, पुष्पाताई काळे, रवि बोरावके यांच्यासह अनेक नगरसेवक विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतला. यावेळी नगरसेवक विरेन बोरावके व त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.
किती बळी गेल्यानंतर येणार जाग
महामार्गावर रस्त्याच्या बाजूला वेड्या बाभळींच्या व अन्य झाडांचे काटवण वाढल्याने रस्त्यावरून पायी व मोटारसायकलवरून जाणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काटवणामुळे अवजड वाहने दिसत नाहीत. त्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत अनेकांचा अपघाती बळी गेला आहे. अजुन किती निरापराधांचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल.
नगरपालिकेचे दुर्लक्ष
महामार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत काटवनाचे जगंल झाले आहे. ते तोडण्याची जबाबदारी जशी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.तशीच ती जबाबदारी कोपरगाव नगरपालिकेची आहे. वारंवार अपघात होतात. यावर पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. जागा मालकांना सांगुन काटवण काढणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेचे अधिकारी – नगराध्यक्षांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.