कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/manchester.jpg)
मँचेस्टर – ICC Cricket World Cupच्या अंतिम टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. अखेरच्या तीन सामन्यात वर्ल्ड कपचा विजेता ठरणार आहे. मंगळवारी बाद फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. कारण आज फायनलचा एक संघ निश्चित होणार आहे. या दोन्ही संघातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येत आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलमध्ये होणारा हा पहिलाच सामना आहे.
दोन्ही संघा दरम्यान साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आज देखील पुन्हा पावसाची बॅटिंग होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अर्थात पावसामुळे आजचा खेळ रद्द झाला तर उद्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर दोन्ही दिवस पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला तर सरासरीच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. पण ही गोष्ट चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी नक्कीच ठरणार नाही. दोन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार मानले जातात. त्यामुळे या दोघांमधील मैदानावरील लढत पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.