कोण आहे सचिन अंदुरे ते पहा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/sachin_andure.jpg)
औरंगाबाद – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
नालासोपारा प्रकरणाशी संबंधित केसापुरी (ता. औरंगाबाद) येथील शरद भाऊसाहेब कळसकर याला अटक झाली होती. त्याच प्रकरणात शहरातील एका तरुणाचा संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे निराला बाजार परिसरात एका हॉटेललगत असलेल्या कापड दुकानावर पाळत ठेवून मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास सचिन अंदुरेला पकडून क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले होते. दरम्यान, सचिन अंदुरे हा दौलताबादचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
कोण आहे सचिन अंदुरे?
– सचिन हा मूळचा दौलताबादचा रहिवासी
– औरंगाबादमधील राजाबाजारमधील वेणू निवास इमारतीत भाड्याने वास्तव्य
– औरंगाबादमध्ये पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांपासून वास्तव्य
– औरंगाबाद सासरवाडी असलेल्या सचिनला एक मोठा भाऊ
– निराला बाजार भागातील एका कापड दुकानात नोकरी
– अंदुरेच्या अटकेपासून त्याच्या राजाबाजारमधील घराला कुलूप
– सचिन दहिहंडी, मिरवणुकांमध्ये असायचा सहभागी
– सचिनचा कोणाशीही वाद नसल्याची शेजाऱ्यांची माहिती
– सचिनच्या फेसबुक अकाउंटवर केवळ प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट