कृषि उत्पन्न बाजार समितीत बसवणार धान्य चाळणी यंत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/bajar-samiti-pune-605x420.jpg)
शेतकऱ्याला शेतमालाचा वाजवी भाव मिळणार
मुंबई – राज्यातील 31 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातच धान्य चाळणी यंत्र बसविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची प्रतवारी बाजार समितीतच करता येणे शक्य होणार असल्याने शेतमालाला वाजवी व योग्य दर मिळणे शक्य होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे.
शेतकऱ्याच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा यासाठी त्याच्या शेतमालाची प्रतवारी होणे आवश्यक असते. शेतमालाच्या प्रतवारीसाठी बाजार समितीमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध नसल्याने शेतमालाची प्रतवारी त्याठिकाणी करता येत नाही.
धान्याच्या साफसफाईसाठी धान्य चाळणी यंत्र बाजार समितीच्याच आवारात उभारण्यात आल्यास शेतकऱ्याला धान्य प्रतवारीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. या दृष्टीने राज्यातील 31 बाजारसमित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उभारण्याचा विचार सरकार करत होते.
बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसविण्यास राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडूनही मंजुरी मिळाली आहे. राज्यातील 31 बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी 1 यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 20.21 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडून त्यासाठी 5.05 कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर 75 टक्के निधी बाजार समिती स्वतः खर्च करणार आहे.
सर्व बाजार समित्यांत प्रत्येकी 2 मे. टन प्रति तास क्षमतेचे एक धान्य चाळणी यंत्र बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.