कांदा-बटाटा तेजीत; ऐन दिवाळीत आणखी दरवाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Untitled-24-7.jpg)
बटाटय़ाची आवक अपुरी, जुन्या कांद्याच्या मागणीमुळे नवा कांदा पडून
बटाटय़ाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बटाटय़ाची मागणी वाढती असली तरी त्या तुलनेत आवक अपुरी होत असल्याने बटाटय़ाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. तसेच बाजारात नवीन कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. मात्र जुन्या कांद्याला मागणी जास्त आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचे दर तेजीत असून कांदा-बटाटय़ाच्या दरातील तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. ऐन दिवाळीत कांदा-बटाटय़ाच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या बाजारात नवीन बटाटय़ाची आवक सुरू आहे. नवीन तळेगाव बटाटय़ाची आवक आणखी पंधरा दिवस सुरू राहील. त्यानंतर बटाटय़ाचा नवा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू होईल. जानेवारी महिन्यापासून बटाटय़ाची आवक सुरळीत होईल. जानेवारी ते एप्रिलपर्यंत बटाटय़ाचा हंगाम सुरू राहणार आहे. जानेवारीपर्यंत बटाटय़ाचे दर तेजीत राहणार असल्याचे गुलटेकडी मार्केटयार्डातील बटाटय़ाचे व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.
पुढील दोन महिने आग्रा बटाटय़ासह गुजरात, कोलकात्ता, कर्नाटक तसेच बेळगाव भागातून बटाटय़ाची आवक सुरू राहील. बटाटय़ाची टंचाई जाणवणार नाही. मात्र, ऐन दिवाळीत बटाटय़ाचे दर तेजीत राहणार असल्याची शक्यता कोरपे यांनी व्यक्त केले. गुलटेकडीतील मार्केटयार्डात ४५ ते ५० ट्रक बटाटय़ाची आवक होत आहे. स्थानिक बटाटय़ाला दहा किलोमागे १९० ते २३० रूपये दर मिळत आहेत. इंदूर येथील बटाटय़ाला उपाहारगृह आणि खानावळ चालकांकडून मागणी आहे. सामान्य ग्राहकांकडून आग्रा येथील बटाटय़ाला मागणी आहे. आग्रा बटाटय़ाला घाऊक बाजारात दहा किलोमागे १४० ते १७० रूपये असा दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदा- बटाटय़ाचे दर
- बटाटा (घाऊक बाजार)- १४ ते १७ रूपये प्रतिकिलो
- बटाटा (किरकोळ बाजार)- ३० ते ३५ रूपये प्रतिकिलो
- जुना कांदा (घाऊक बाजार)- १५ ते २० रूपये प्रतिकिलो
- जुना कांदा (किरकोळ बाजार) – ३० ते ३२ रूपये प्रतिकिलो
पावसामुळे कांदा लागवडीवर परिणाम
यंदा परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. लागवड केल्यानंतर पाणी अपुरे पडले तर रोपे जळून जाण्याची शक्यता असल्याने नवीन कांद्याची लागवड करण्यात आली नाही. जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीत किरकोळ बाजारात प्रतिकिलो कांद्याचे दर चाळीस ते पन्नास रूपयांपर्यंत राहतील, असे राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.