कर्नाटकच्या राज्यपालांवर बोलताना निरुपमांची जीभ घसरली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sanjay-nirupam-1.jpg)
मुंबई : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या झालेल्या विजयानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेले विधान वादात आले आहे. निरुपमांनी कर्नाटकच्या राज्यपालांवर टीका करताना त्यांची तुलना थेट कुत्र्याशी केली. त्यामुळे निरुपमांवर चौफेर नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपकडून निरुपम यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेसकडूनही निरुपम यांचे विधान चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निरुपम यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
”कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपसाठी प्रामाणिकपणा दाखवून एक नवं उदाहरण निर्माण केले आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती आता आपल्या कुत्र्याचं नाव वाजूभाई वाला असे ठेवेल,” असे निरुपम म्हणाले. ”कर्नाटकच्या राज्यपालांनी संविधान आणि लोकशाहीची हत्या केली हे वास्तव आहे. मात्र संजय निरुपमांच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नाही. कारण, विरोधकांसाठीही आमच्या राजकारणात आदर आहे. विरोधकांवर खालच्या स्तराची टीका करणं ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनीही याची मर्यादा ठेवावी,” असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
”राज्यपालांनी जर चुकीचा निर्णय घेतला, असं निरुपमांना वाटत असेल, तर त्यावर टीका करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र राज्यपालांची कुत्र्याशी तुलना करणं भारतीय राजकारणात यापूर्वी कधीही झालं नव्हतं,” असे म्हणत भाजप प्रवक्ते शाहनावज हुसेन यांनी निरुपमांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.