breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कर्तृत्व आणि दातृत्वाला कृतज्ञतेचे कोंदण

दिलीप माजगावकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

हाताचे बोट धरून प्रकाशन व्यवसायात सामावून घेणारे श्री. ग. माजगावकर यांनी ज्या कार्याला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले अशा सात संस्थांना निधी अर्पण करून श्रीगमा यांच्या कर्तृत्व आणि दातृत्वाला कृतज्ञतेचे कोंदण लाभले. साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि वाचकांच्या उपस्थितीत बंधुप्रेमाने भारलेल्या वातावरणात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांचा शनिवारी अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला.

राजहंस प्रकाशनला भक्कम वैचारिक पाया देणाऱ्या श्रीगमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित विकास, डांग सेवा मंडळ, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आणि पुणे भारत गायन समाज या सात संस्थांना सन्मानपूर्वक निधी सुपूर्द करण्यात आला.

प्रकाशन व्यवसायात राजहंसी मुद्रा उमटविणारे दिलीप माजगावकर यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, रेखा माजगावकर आणि लेखिका मंगला आठलेकर या वेळी उपस्थित होत्या. डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा प्रयोग लिहून दिल्यामुळे अनुपस्थित असलेल्या विजया मेहता यांचे दृक-श्राव्य मनोगत आणि रसाळ भाषाशैलीची गुंफण करीत कार्यक्रमाची रंगत वाढविणारे अंबरिष मिश्र यांचे सूत्रसंचालन हे खास वैशिष्टय़ ठरले.

मोठय़ा मनाने प्रकाशन व्यवसायात सामावून घेत सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारे श्रीगमा यांच्याविषयी दिलीप माजगावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चुकलेल्या निर्णयाबद्दल कधी एका शब्दानेही न बोलण्याची त्यांची कृती मला मानसिक आणि आर्थिक कोंडीमध्ये विश्वास देऊन गेली. त्यातून अंशत: ऋणमुक्त होण्याची संधी म्हणून हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. ग. माजगावकर पुरस्काराची घोषणा

राजहंस प्रकाशनतर्फे जानेवारी ते डिसेंबर अशा वर्षभरात प्रकाशित होणाऱ्या मराठीतील वैचारिक पुस्तकाला ‘श्री. ग. माजगावकर पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा संचालक डॉ. सदानंद बोरसे यांनी केली. पुढील वर्षांपासून हा पुरस्कार सुरू करण्यात येणार असून श्रीगमांच्या जन्मशताब्दीपर्यंत म्हणजे अकरा वर्षे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचे संयोजन करण्याची जबाबदारी डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्राकडे देण्यात आली आहे, असेही बोरसे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button