औटघटकेच्या लग्नात शेतकरी मुलास पन्नास हजारांचा गंडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/rj088.jpg)
श्रीरामपूर – शेतकरी मुलांबरोबर लग्न करायला मुली तयार होत नसल्याने त्याचा गैरफायदा लग्न जमविणारे काही दलाल घेत आहेत.अशाच एका घटनेत नवरदेवास ५० हजारांचा गंडा घातला असून पोलिसांनी जाकीर उर्फ बाळासाहेब बबन पठारे (रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर), प्रियंका प्रकाश रोकडे व अनिता प्रकाश रोकडे (रा. मुळा प्रवरा वीज संस्थेमागे, श्रीरामपूर) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अवघ्या पन्नास हजार रुपयांसाठी पांगरी बुद्रुक (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील किशोर एकनाथ पगार (वय ३२) याच्या बरोबर लग्न लावले, तीन दिवस समारंभाचा आनंदही लुटला व नंतर पोबाराही केला.
वावी (ता.सिन्नर) जवळ पांगरी बुद्रुक येथे किशोर आई मंदाकिनी व भाऊ संदीपसह राहतो. तीन एकर जिरायत जमीन असल्याने त्यात भागत नाही. त्यामुळे सिन्नर औद्य्ोगिक वसाहतीत कामही करतो. ३२ वर्षे वय होऊ नही लग्न झाले नव्हते.एकदा शहरात त्यांची ओळख जाकीर या सोयरिक जमविण्याबरोबर झाल्यावर त्याने प्रियंका शिंदे या नावाची मुलगी दाखविली. ती अनाथ असून तिचा सांभाळ बहीण अनिता हिने केल्याचे सांगितले. मुलगी पसंत झाल्यानंतर जाकीरने पन्नास हजार रुपये हुंडय़ाची मागणी केली. ते दिल्यानंतर त्याच दिवशी लग्न झाले व एका मोटारीतून नवरा-नवरीसह, नातेवाईक व बहीण म्हणवणारी अनिता ही कलवरी म्हणून गावी आली. त्यानंतर पुन्हा पांगरी येथे किशोर याच्या नातेवाइकांनी लग्न लावले व त्या वेळी सात हजारांचे दागिने घातले. घरी सत्यनारायण झाल्यावर मुलगी,अनिता या नवरदेव व अन्य मंडळीसह शहरात आल्या.
तेथे एका आजीबरोबर भेट घडवली व त्यानंतर साडय़ा आणण्याच्या निमित्ताने प्रियंका व अनिता बाहेर पडल्या, त्या परतल्याच नाहीत. सोयरिक्या बाळासाहेब पठारे हा देखील फरार झाला. दिवसभर थांबूनही नवरी न परतल्याने पेच उभा राहिला. मात्र काही लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेतली असता या औटघटकेच्या लग्नावर प्रकाश पडला. नवरी प्रियंका हिचे आडनाव शिंदे नसून रोकडे असल्याचे तसेच तिच्यासोबत असलेली कलवरी अनिता ही प्रियंकाची बहीण नसून आई असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे जाकीर उर्फ बाळासाहेब पठारे याने अनेकांना अशाचप्रकारे फसविल्याचे उघड झाले. किशोर हा फिर्याद देण्यासाठी आला असता पठारे याने जिवे मारण्याच्या व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. मात्र उपअधीक्षक वाघचौरे यांनी दिलेल्या पाठबळामुळे त्याने फिर्याद देण्याची हिंमत केली