एसटी आंदोलनात अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/st1.jpg)
मुंबई: वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यांत पुकारलेल्या कामबंद आंदोलनात अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने महामंडळाचेही मोठे नुकसान झाले आहे. या आंदोलनाबाबत बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या, गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. वेतन रोखणे वा बदली अशा स्वरूपाची ही कारवाई असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे. त्यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, केवळ कर्मचारीच नव्हे, तर अप्रत्यक्षपणे आंदोलनास सहाय्यभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ज्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कामगिरी बजावली नाही, अशांवर कारवाई करण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या आंदोलनास सहाय्यभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन रोखणे वा त्यांच्या बदलीचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते.