उस्मानाबादमध्ये मराठा मंत्री, नेते आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Maratha-1.jpg)
उस्मानाबाद – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी 9 च्या सुमारास शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करून उपस्थित असलेल्या हजारो मराठा समाज बांधवांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर जिल्ह्यात एकाही मराठा मंत्री अथवा लोकप्रतिनिधींना पाऊल ठेऊ दिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मागणीसाठी आत्मबलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करून शहरातून दुचाकीवरून तरूणांनी फेरी काढली. व्यापार्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहर आणि जिल्ह्यातील व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या भावनांचा आदर केला. काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता जिल्ह्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. राज्यातील सर्व मराठा लोकप्रतिनिधींच्या नावाच्या फलकाला चपलांचा हार घालून त्यांचे श्राध्द घालण्यात आले. दिवसभर शहरातील अनेक भागात तणावाची परिस्थिती होती. जिल्ह्यातील उमरगा, परंडा, भूम, वाशी, लोहारा, कळंब येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर उतरलेल्या तरूणांची संख्या पाहता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता.
बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने आगारातून एकही बस बाहेर सोडली नाही. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यात दिवसभर एकही बस रस्त्यावर धावली नाही. प्रत्येक आगारात एका रांगेत सर्व बस उभ्या असल्यामुळे प्रवाशांचा मात्र मोठा खोळंबा झाला. बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. बंदला प्रतिसाद देत जिल्हाभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सकाळी सोडून देण्यात आल्या.