उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/vidhanbhavan.jpg)
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे बहुमत नसल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्त्वातील सरकार अवघ्या 79 तासात कोसळलं.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीकडून आज नेतानिवड केली जाणार आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वसंमती असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही उद्धव ठाकरेच हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असं सांगितलं. “उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ते बैठकीला उपस्थित होते, त्यांनी होकार दिला आहे. उद्धव ठाकरे राज्यपाल यांच्याकडे सरकारस्थापनेचा दावा करण्यास जाणार आहेत”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.