उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांच्या दरबारी
![‘Write it down, 4 April 2021’; Thackeray government to fall: BJP spokesperson Avadhut Wagh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/udhav-thAkre.jpg)
मुंबई. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी पुन्हा एकदा विनंती राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी केली. याबाबत सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निर्णय झाला होता.
प्रस्ताव पाठवल्यानंतर नियुक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. मात्र, मंत्रिमंडळाची केलेली शिफारस नियमाप्रमाणे नसल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यपालांनीही महाधिवक्त्यांशी चर्चा केली होती. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपला पवित्रा बदलला आणि पुन्हा प्रस्ताव मांडण्याचे ठरवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, या अगोदर आम्ही जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिले आहे. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात अगोदर पत्र दिले होते.
राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळेच पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे शिफारस पत्र राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांनी यावर विचार करतो, असे सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.