उद्घाटनाला बोलावले नाही म्हणून शिवसेना नगरसेविकेने शाळा बंद पाडली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/oshivara-school-12.jpg)
मुंबईतील ओशिवारा येथे सुमारे २३० गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एक शाळा सुरू करण्यात आली होती. मागील महिन्यात शाळा सुरूही झाली होती. पण स्थानिक शिवसेना नगरसेविकेच्या नाराजीमुळे ही शाळाच बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्याला सांगितले नाही, यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी जोपर्यंत महापौर यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन केले जात नाही. तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
ओशिवारातील आदर्श नगर येथे एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या तळमजल्यावर सात खोल्यांमध्ये इंग्रजी माध्यमांचे सातवीपर्यंतचे वर्ग भरायचे. महापालिकेने १५ जून रोजी ही शाळा सुरू केली होती. दोन दिवसांनंतर लगेच ही शाळा बंद करण्यात आली. नगरसेविका म्हणून मी चारवेळा निवडून आलेली आहे. शाळा सुरू करण्याबाबत मला सांगणे आवश्यक होते. पण प्रशासनाला याची गरज वाटली नाही, असे पटेल यांनी म्हटले. पण कमी खोल्यांमध्ये जास्त वर्ग भरवण्यात येत असल्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला आहे.
सातवीपर्यंतचे वर्ग सात खोल्यात कसे भरवले जातात, असा सवाल त्यांनी केला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरच ही शाळा सुरू होईल. मला महापालिकेबाबत अडचण नाही. पण आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शाळा बंद केल्यामुळे पालक चिंतेत आहेत. सर्व पालक हे मोलमजुरी करणारे आहेत. खासगी शाळेत मुलांना शिकवणे त्यांना परवडत नसल्याने ही शाळा सुरू करण्यात आली होती. सोमवारी त्यांनी ओशिवारा पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनेही केली.