उत्पन्न घटल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन
![एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी; ६२३ जणांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/st-bus-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज | पुणे
मागील दोन महिन्यांत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले जात आहे. तसेच इतर काही विभागांतील एक-दोन आगारांमध्येही अंशत: वेतन दिलेले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन तातडीने देण्यात आल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला दिले जाते. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील वेतन अनेक कर्मचाऱ्यां ना कमी मिळाले. एसटीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.
कर्मचारी संघटनांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, महामंडळाने ‘ही कपात नसून वेतनासाठी पुरेसे पैसे नसल्याने अंशत: वेतन दिल्याचे’ स्पष्ट केलेले आहे. एसटीचे ३१ विभागांतर्गत एकूण २५० आगार आहेत. या आगारांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये महिन्याच्या १ तारखेपासून प्रवासी उत्पन्न स्थानिक पातळीवर संकलित करण्यात येते. वेतनासाठी मध्यवर्ती कार्यालयातूनही दरमहा ५० टक्के निधी विभागाला वितरित केला जातो. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते.