breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी

उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचारात आपल्याला अजिबात सहकार्य केले नाही, उलट सारखे पैशांची मागणी करीत होते. यातून प्रचार भरकटला गेला, अशी तक्रार उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केली असून, या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी नेतृत्वाकडे केली आहे.

मतदान पार पडल्यावर निकालाच्या आधी उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात उत्तर मुंबई काँग्रेसमधील नेत्यांचा भोंगळ कारभार उघड केला आहे. या निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी मातोंडकर यांचा जवळपास चार लाखांनी पराभव केला. आपण ही निवडणूक गांभीर्याने लढलो, पण उत्तर मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अजिबात गांभीर्याने घेतली नव्हती.

मुंबई काँग्रेस तसेच उत्तर मुंबई काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक हेवेदावे, राजकीय अपरिपक्वता यामुळे प्रचाराच्या काळात गोंधळ निर्माण झाला. त्याचा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांवर परिणाम झाला, असे मत मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे.

पक्षाने संदेश कोंडवीलकर आणि भूषण पाटील या दोन पदाधिकाऱ्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली होती. पण दोघांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडली नाही. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात पाटील हे कमी पडले. उमेदवारीच्या काळात पक्षाने सारी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण उत्तर मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. मध्यवर्ती कार्यालयाची जागा अपुरी होती आणि त्यात साधनांचा अभाव होता. मतदारसंघात स्थानिक पातळीवर छोटी कार्यालये थाटलीच गेली नाहीत. प्रचार पत्रकांचे योग्यपणे वाटप झाले नाही. परिणामी मतदारांपर्यंत आपले पत्र पोहचलेच नाही. प्रचारसभा, पदयात्रा वेळेत सुरू झाल्या नाहीत. या साऱ्यांचा प्रचारावर परिणाम झाला, असा तक्रारीचा सूरही मातोंडकर यांनी लावला आहे.  जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे यांच्याबद्दलही मातोंडकर यांनी पत्रात नाराजीची भावना व्यक्त केली आहे.

बेशिस्तीबद्दल कोंडवीलकर आणि पाटील यांच्या विरोधात कारवाई करावी आणि उत्तर मुंबई काँग्रेस संघटनेत बदल करावे, असेही मातोंडकर यांनी पत्रात सुचविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button