उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
![young man died due to gas gieser blast suffocating breath](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/death-186_201905235119.jpg)
उघड्या पडलेल्या विद्युत केबलवर पाय पडल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शीव-पनवेल महामार्गावर घडली. यात सुरेश जुनघरे या ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.
रात्री दीडच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेरील शीव-पनवेल महामार्गावरील बस थांब्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. सुरेश हे पत्नी व दोन अपत्यासह तुर्भे येथे राहत असून काम संपल्यावर ते घरी पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे दुभाजकावरून चालत असताना त्या ठिकाणी पाण्यात उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा त्यांना शॉक लागला. जवळील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करतेवेळी उघडी झालेली विद्युत केबल डबक्यात पडून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. नेमका त्यातच सुरेश यांचा पाय पडला व त्यांचा करूण अंत झाला.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असले तरी संबंधित दोषी पीडब्ल्यूडी तसेच ठेकेदारावर कारवाईची मृताच्या नातेवाईकांची मागणी केली आहे. संबंधीत कंत्राटदार आणि अभियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे अशी माहिती सानपाडा पोलिसांनी दिली.