इतिहासात पहिल्यांदाच, दख्खनचा राजा जोतिबा देवाचे मंदिर ठेवले बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/6-16.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी आज प्रशासनाने श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर ता.पन्हाळा येथील दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाचे मंदिर बंद ठेवले. जिल्हाधिकारी दौलत देसाई जोतिबा डोंगरावर जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे आज मध्यरात्रीपासून मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. येणाऱ्या सर्व भाविकांना दरवाजातून मुख दर्शन घ्यावे लागले. डोंगरावरील इतिहासात मंदिर दिवसभर बंद ठेवण्याची ही पहिलीच घटना आहे. प्रशासन आज मंदिर बंद ठेवणार आहे.
याबाबतची ग्रामस्थ,पुजारी,भाविक यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.त्यामुळे डोंगरावर आलेले भाविक गोंधळून गेले. आज रविवार असल्याने डोंगरावर नेहमी प्रमाणे भाविक आले. गर्दी ही थोडी कमी प्रमाणात होती. पण मध्यरात्री पासूनच प्रशासनाने मंदिराचे सर्व दरवाजे कुलूपबंद केले. मंदिरात फक्त पुजारी वर्गाला प्रवेश दिला गेला. मंदिर बंद केल्याची बातमी सोशल मिडियाव्दारे राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. येणारे काही भाविक कोल्हापुरातून काही डोंगर घाटातून परतले. सकाळी अकरा वाजल्यापासून पोलीस यंत्रणेने दानेवाडी,गिरोली,चव्हाण तळे या ठिकाणी नाका बंदी करुन भाविकांना डोंगरावर प्रवेश दिला नाही. त्यामुळे भाविकांना केवळ डोंगराचे दर्शन घेऊन परतावे लागले.
दरम्यान, आज मंदिर बंद ठेवल्याच्या घटनेने जोतिबाच्या चैत्र यात्रे बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ७ एप्रिल रोजी होणारी चैत्र यात्रा होणार का ? जिल्हाधिकारी या यात्रेबाबत काय निर्णय घेणार ?याकडे ग्रामस्थ,पुजारी, भाविक सासन काठीधारक यांच्या नजरा लागल्या आहेत.