आरे कारशेडचा अहवाल परिपूर्ण नाही, तो बंधनकारकही नाही – आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Aditya-Thackeray-4.jpg)
मुंबई | महाईन्यूज
आरे कॉलनीतील कारशेडच्या बाबतीत समाधानकारक अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे परिपूर्ण अहवाल आल्यानंतर कारशेडच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णय आपण पाहिले असतीलच. पर्यावरणाची हाणी न करता विकास करायचा आहे, याच्यावर विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरण आणि पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या २५ व्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. आरे कारशेडच्या अहवालासंबंधी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आरे कारशेडच्या बाबतीत अहवाल अजूनही पूर्ण आलेला नाही. तो बंधनकारक नाही. अहवालावर अभ्यास करुनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने तात्काळ स्थगिती उचलली पाहिजे, अशी मागणी केली आहे. कारशेड आरेमध्येच झालं पाहिजे, अशी शिफारस असेल तर सरकारने तात्काळ स्थगिती उचलली पाहिजे. प्रत्येक दिवशी होणारा उशीर पाच कोटी रुपयांचं नुकसान करत आहे. त्यामुळे अधिक नुकसान होऊ न देता सरकारने तात्काळ अहवाल स्विकारुन स्थगिती उचलून वेगाने कामाला सुरुवात केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.