आदर्श गाव ‘हिवरे बाजारात’ तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक
अहमदनगर – राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले जात आहे. बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी मोठ मोठ्या रक्कमेची देखील घोषणा केली जात आहे. मात्र गेली अनेकवर्ष जेथे बिनविरोध निवडणुका होत होत्या, त्या ग्रामपंचायतीमध्ये यंदा निवडणुका होणार असल्याचे चिन्ह आहे.
वाचा :-सरपंचपदाच्या लिलावाच्या घटनेची गंभीर दखल, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजार गावात अनेक वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मागील 30 वर्षे या गावातील निवडणूक ही बिनविरोध होत होती.
हिवरे बाजार गावात शेवटची ग्रामपंचायत निवडणूक ही 1985 साली झाली होती. त्यानंतर 1989 साली सुरु झालेली बिनविरोध निवडणुकीची मालिका यंदा खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होत आहे.
तर दुसरीकडे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणुकीस सुरुंग लागत ७ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. केवळ दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या 45 वर्षात दुसऱ्यांदा राळेगण मध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.