… आणि एकनिष्ठ शिवसैनिकाच्या मदतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धावले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200217-WA0025.jpg)
भोकरदन | महाईन्यूज | प्रतिनिधी
राजकारणात सत्ता, पद, पैसा आला की रात्रंदिवस झटणाऱ्या प्रामाणिक, सच्च्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. पण भोकरदन येथील तीस वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी महेश पुरोहित यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आलेला अनुभव अविस्मरणीय ठरला. आजारी सासऱ्यासाठी मदत करा असा संदेश पुरोहित यांनी उद्धव ठाकरे यांच्या वैक्तिक मोबाईलवर पाठवला आणि चक्क मुख्यमंत्र्यांनीच त्यांना फोन केला. केवळ फोन करून ते थांबले नाहीत, तर चोवीस तासात सगळी यंत्रणा कामाला लागली आणि पुरोहित यांच्या सासऱ्याच्या उपचारांचा खर्चही भागवला.
महेश पुरोहित हे गेल्या तीस वर्षांपासून भोकरदन येथे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
संघटनेचे काम करत असताना त्यांचे मातोश्रीवर येणेजाणे , आणि पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांशी देखील चांगले संबध आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून चार वर्षांपासून विविध सामाजिक कामामुळे पुरोहित यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक फोन नंबर आहे. पुरोहित यांचे सासरे आजरी असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आतापर्यंत त्यांनी उपचारावर दीड लाख रुपये खर्च केले होते. परंतु अजूनही तेव्हढेच पैसे लागणार होते. महात्मा फुले योजना, राजीव गांधी योजना आदी सर्व पर्याय करून चुकले होते, मुख्यमंत्री सहाय्य निधीतून वेळ लागणार होता. काय करावे हे सुचत नव्हते. अचानक उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागण्याचा विचार पुरोहित यांच्या मनात आला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रचंड व्यस्त असल्यामुळे ते मेसेज पाहतील आणि मदत करतील असे पुरोहित यांना वाटले देखील नसेल. त्यामुळे मेसेज पाठवून ते आपल्या कामात व्यस्त झाले. दुपारी सव्वाबारा वाजता पाठवलेल्या मेसेजला रात्री पावणेबारा वाजता फोनने उत्तर मिळाले. पण भोकरदनला जाण्यासाठी बसमध्ये असल्यामुळे पुरोहित यांना फोन आल्याचे लक्षात आले नाही.
चोवीस तासांत यंत्रणा हलली
तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा पुरोहित यांनी तो घेतला तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक सुधीर गायकवाड बोलले आणि सीएम साहेब बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणी तरी आपली खेचतय असे वाटल्याने “कशाला मजाक करताय असे म्हणत पुरोहित यांनी दुर्लक्ष केले, पण समोरून तुम्ही मेसेज पाठवला होता असे सांगितल्यावर मात्र खात्री पटली. काही कळायच्या आत समोरून स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. “आपण ज्या संदर्भात मला मेसेज केला त्याची संपूर्ण माहिती यांना द्या आपले काम तात्काळ मार्गी लावतो” एव्हडे बोलून मुखमंत्र्यांनी फोन ठेवला.
पुरोहित यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी फोनवर सर्व अडचण सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांचा फोन आला. पुरोहित यांच्याकडून सगळी आवश्यक माहिती घेतल्यानंतर चॅरिटी कमिशनर अमृतकर,जॉईंट कमिशनर कायटे, जिल्हाधिकारी औरंगाबाद , सिव्हिल सर्जन राठोड जालना यांच्यासह 10 ते 15 अधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ फोन आले. हॉस्पिटलमध्ये आधीच फोन येऊन पेशंटच्या उपचाराच्या खर्चाची व्यवस्था देखील झाली होती. एका मेसेजवर सगळी यंत्रणा चोवीस तासाच्या आत हलली. पेशंटचे नंतरचे जवळपास दीड लाख रुपयांचे बिल माफ होऊन डिस्चार्जही मिळाला. माझ्यासाठी हे स्वप्नवत होते. पण शिवसैनिक असल्याचा आणि उद्धव ठाकरे आमचे नेते असल्याचा अभिमानही आहे. सामान्य शिवसैनिकांच्या हाकेला ओ देणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे मेसेज पाठवून पुरोहित यांनी आभार मानले. मेसेज टाईप करतांना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.