अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना वाढती मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Aruna-Dhere-1.jpg)
यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना मागणी वाढली आहे. त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘कृष्णकिनारा’ या कवितासंग्रहाची नवी आवृत्ती शनिवारपासून (३ नोव्हेंबर) उपलब्ध होणार असून विविध बारा पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
कविता, ललित लेखन, संशोधनपर लेखन, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा वाङ्मयाच्या विविध प्रांतामध्ये लेखन करणाऱ्या ढेरे यांची रविवारी (२८ ऑक्टोबर) यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच सर्व स्तरातून त्यांचे स्वागत झाले. त्यांच्या विविध पुस्तकांची मागणी वाढली असून गेल्या चार दिवसांत शंभराहून अधिक पुस्तकांची विक्री झाली असल्याची माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. ‘कृष्णकिनारा’ कवितासंग्रहाला सर्वाधिक मागणी असून ‘दुर्गा भागवत : व्यक्ती विचार आणि कार्य’ या संशोधनपर पुस्तकाच्या प्रती विकल्या गेल्या आहेत. दोन वाचकांनी ढेरे यांच्या सर्व पुस्तकांचा संच खरेदी केला आहे. पद्मगंधा प्रकाशन आणि अभिजित प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली ढेरे यांची पुस्तके उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘कृष्णकिनारा’ची नवी आवृत्ती शनिवारपासून वाचकांच्या हाती पडेल, असे सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांनी सांगितले. ‘भगव्या वाटा’, ‘महाद्वार’, ‘उर्वशी’, ‘मैत्रेयी’, ‘लावण्ययात्रा’, ‘रूपोत्सव’, ‘मन केले ग्वाही’, ‘जाणीवा जाग्या होताना’ या पुस्तकांसह ‘निळ्या पारदर्शक अंधारात’, ‘जावे जन्माकडे’ आणि ‘यक्षरात्र’ या कवितासंग्रहांच्या नव्या आवृत्त्या लवकरच वाचकांच्या हाती पडतील, असे कारले यांनी सांगितले.
ऊन उतरणीवरून
डॉ. अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचा समावेश असलेला ‘ऊन उतरणीवरून’ हा नवा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस येत आहे. या संग्रहातील कवितांची निवड प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी केली असून त्यांनीच प्रस्तावना लिहिली आहे, असे शैलेंद्र कारले यांनी सांगतिले.