अमित शहा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/amit-shah-and-uddhav.jpg)
मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्या, बुधवारी संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी अमित शहा २०१९ ची निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत आल्यावर मातोश्रीवर जाण्यास नेहमी टाळाटाळ करणारे अमित शहा मातोश्रीवर जात असल्या कारणाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. उद्धव ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरु होती, मात्र तसं काही झालं नाही. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा युतीच्या वाटाघाटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.