“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल” राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Raj-and-Uddhav.jpg)
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात तात्काळ सूट देण्याची मागणी केलेली आहे. “राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला हवीय, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल” असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे.
काय म्हणाले आहेत राज ठाकरे पत्रामध्ये?
“कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.” “खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिलेला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येते आहे.” असा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे.
“तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली तीन महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्या सवा बिलं आकारली गेलेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे.” असेही राज ठाकरे यांनी लिहिले आहे.