अंधेरीच्या पुलावरील एक मार्गिका सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/andher-bride.jpg)
मालाडचा स्कायवॉक बंद; टिळकनगरचा धोकादायक पूल पाडला; घाटकोपरचा पूल तपासणीअंती सुरू
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या दुर्घटनाग्रस्त उड्डाणपुलाची उत्तरेकडे जाणारी एक मार्गिका रविवारी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्याचबरोबर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वांद्रे, वसई येथील पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आले. खबरदारीची उपाययोजना म्हणून धोकादायक बनलेला मालाड येथील स्कायवॉकही बंद करण्यात आला आहे. तर तडा गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे बंद करण्यात आलेला घाटकोपर येथील उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलगाडय़ा रविवारी विलंबाने धावत होत्या.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील पदपथाचा भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर येथील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग खचल्याची भीती सर्वत्र पसरली आणि हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अंधेरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शनिवारी रात्री या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि पालिका व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या पुलाची पाहणी केली. अखेर रविवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील विद्याविहार आणि भायखळा यांदरम्यान घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वेने हा निर्णय घेतला. मात्र पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने होत होती. मालाड पश्चिमेच्या दक्षिणेकडील पादचारी पूल व रेल्वेचा दक्षिणेकडील पुलाला जोडणारा स्कायवॉक खबरदारीची उपाययोजना म्हणून शनिवारपासून बंद करण्यात आला. त्याचबरोबर वांद्रे येथील उड्डाणपुलाचा दक्षिणेकडील पदपथ, वसई येथील उड्डाणपूलही सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.
हार्बर मार्गावरील टिळक नगर रेल्वे स्थानकापासून सुमारे २०० मीटर अंतरावर १९८९ मध्ये बांधण्यात आलेला पादचारी पूल धोकादायक बनला होता. सांताक्रूझ-कुर्ला लिंक रोड उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर हा पादचारी पूल बंद करण्यात आला होता. मात्र अद्यापही तो तोडण्यात आला नव्हता. अंधेरीच्या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनाने अखेर रविवारी हा पादचारी पूल तोडून टाकला. रविवारी दुपारी १२.०५च्या सुमारास हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम दुपारी ४.०५ वाजता पूर्ण झाले. या कामासाठी हार्बर मार्गावर विशेष मेगाब्लॉग घेण्यात आला होता. पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.