ताज्या घडामोडीपुणेराजकारण

विधानसभेसाठी शरद पवार गटाने पुण्यातील ६ मतदारसंघावर केला दावा

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. असा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे त्याच वेळी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचाने दावा केला आहे. त्यामुळे मुंबईत जरी एकीचे बळ महाविकासाकडे दाखवले असले तरी पुण्यात मात्र राष्ट्रवादीच्या दाब्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुण्यातील आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हवेत, असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.

आजचा बैठकीत दाबा केलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांतील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्याच मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून पुन्हा एकदा आघाडीतील वाद आणि मतभेद समोर येणार असल्याचे दिसते.

या बैठकीस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड़, जिल्हा अध्यक्ष माज़ी आमदार श्री. जगनाथबाप्पू शेवाळे, माजी आमदार कुमारभाऊ गोसावी, अंकुशराव काकडे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button