breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : प्रभाग रचना, आरक्षण  सोडतपूर्वी पक्षांतर ही ‘राजकीय आत्महत्या’च!

– भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेनेतील इच्छुकांची मोठी घालमेल

– नाराज, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडूनही ‘देव पाण्यात’

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

महापालिका आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सभागृहात प्रवेश करायचाच… मग, पक्ष कोणताही असो…पॅनेल कसाही… पण, मला नगरसेवक व्हायचेच आहे… अशीच काहीशी मानसिकता पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय इच्छुकांची आहे. परंतु, प्रभाग रचना अन्‌ आरक्षण सोडतीपूर्वी पक्षप्रवेश करणे म्हणजे ‘राजकीय आत्महत्या’च अशी भितीही इच्छुकांमधून बोलून दाखवली जात आहे.

केंद्रातील भाजपा सरकारबाबत असलेली नाराजी, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील समन्वयाचा अभाव, प्रभागाबाबत चर्चेत असलेली अश्चितता, लांबलेली प्रभाग रचना… नेत्यांकडून कसलाही स्पष्ट संकेत नाही, अशा सावळा-गोंधळाच्या परिस्थितीत पिंपरी-चिंचवड निवडणुकीची तयारी सुरू आहे. काही जाणकारांच्या मते निवडणूक लांबणीवर पडेल, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, निवडणूक निश्चित वेळेतच होईल, असा दावाही केला जात आहे. परिणामी, पक्षांतर, नाराजी, संधी न मिळालेल्यांना आपला ‘वचपा’ काढण्याची संधी मिळेनाशी झाली आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपामधील २५ ते ३० नगरसेवक नाराज आणि बंडखोरीच्या तयारीत आहेत, असा दावा काही दिवसांपासून केला जात होता. मात्र, अद्याप एकही प्रवेश झालेला नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील काही मंडळी भाजपाच्या वाटेवर आहेत, असेही असेही सांगितले जात होते. परंतु, अद्याप एकाही नगरसेवकाने पक्षांतकरून कुणी कमळ हाती घेतलेले नाही. कारण, प्रभाग रचना आणि आरक्षणा सोडतीपूर्वी पक्षांतर करणे राजकीयदृष्टया ‘प्रिमॅच्युअर डिसिजन’ ठरणार आहे.

भाजपाला बंडखोरीची भिती पण…

सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ ७६ इतके आहे. त्यापैकी दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्यस्थितीला भाजपाकडे ७४ नगरसेवक आहेत. यापैकी काहीजण स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज आहेत. ज्यांना तिकीटवाटपात संधी मिळणार नाही. ते नगरसेवक राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित आहे. मात्र, त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार एका प्रभागात किमान लोकसंख्या ३५ ते ४० हजार इतकी राहणार आहे. त्यापैकी सरासरी सुमारे २५ ते २७ हजार मतदान होईल, असे अपेक्षीत धरले. तर एका नगरसेवकाला निवडून येण्यासाठी सुमारे ८ ते १० हजार मतदार खेचावे लागणार आहे. वास्तविक, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजपामधील बहुतेक नगरसेवकांना वैयक्तीक ताकदीवर ८ ते १० हजाराचा टप्पा गाठणे मुश्किल वाटते. दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार की स्वतंत्रपणे यावर अद्याप स्पष्ट संकेत मिळालेले नाही. त्यामुळे भाजपामधील नाराज नगरसेवक ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती भाजपासाठी अनुकूल राहील, असेही राजकीय जाणकार सांगतात.

राष्ट्रवादी, शिवसेनेकडे उमेदवार नाहीत?

भोसरी, पिंपरी आणि चिंचवड अशा तीनही विधानसभा मतदार संघामध्ये सत्ताधारी भाजपाच्या दोन्ही आमदारांनी बहुतेक उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत, असे सांगितले जाते. दुसरीकडे, प्रदेश पातळीवर शांतता असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील इच्छुकांसह नाराजांनाही अद्याप निर्णय घेता येत नाही. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपा आव्हान देणे सोपे होणार आहे, असा दावा केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button